परिस्थिती गंभीर, लोकांमध्ये योग्य जनजागृतीची गरज
रुग्णाला कोविडचा संसर्ग झाल्यापासून ते रुग्ण अत्यवस्थ होण्याचा कालावधी कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना पूर्वीपेक्षा अधिक घातक झाला असून, स्वत:चा बचाव करण्यासाठी काय करायला हवे, कोरोनापासून कसे सुरक्षित राहता येईल, तसेच प्रकृती अत्यवस्थ होण्यापूर्वीच नागरिकांनी काय करावे, याविषयी नागरिकांमध्ये आराेग्यविषयक शिक्षणासोबतच त्यांच्यात जनजागृतीची गरज असल्याचे केंद्रीय वैद्यकीय पथकाने सांगितले.
आज जीएमसी, मनपाच्या आरोग्य सुविधांचा घेणार आढावा
कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दाखल झालेले केंद्रीय पथक सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह मनपाच्या आरोग्य यंत्रणेला भेट देणार असल्याची माहिती आहे. या ठिकाणी हे पथक प्रत्यक्ष परिस्थितीचा स्वत: अनुभव घेऊन त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.