अकोला: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘एमआरआय’चे अवाजवी शुल्क कमी करुन सर्वसामान्यांना परवडेल एवढे शुल्क आकारण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीअकोला जिल्हा शाखेच्यावतीने गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांचा ‘एमआआय’ काढण्यासाठी दोन हजार रुपयांचे अवाजवी शुल्क आकारण्यात येत असल्याचा आरोप करीत, ही अवाजवी शुल्काची रक्कम सर्वसामान्य रुग्णांना परवडणारी नाही.
त्यामुळे पैशाअभावी सर्वसामान्य रुग्ण ‘एमआरआय’ सारख्या महत्वाच्या तपासणीपासून वंचित राहतात. परिणामी रुग्णांचे योग्य निदान व औषधोपचार रुग्णांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘एमआरआय’ चे शुल्क कमी करुन सर्वसामान्यांना परवडेल एवढे करण्यात यावे तसेच दारिद्रयरेषेखाली रुग्णांना ही सुविधा मोफत देण्यात यावी, ओपीडी दहा तास सुरु ठेवण्यात यावी, अपुरे असलेले मनुष्यबळ विचारात घेता, कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तातडीने राबवून सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा देण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये यांना देण्यात आले.यावेळी वंचित बहुजन बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल फाटकर, जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर, गजानन दांडगे, विकास सदांशिव, किशोर जामनिक, रुग्णसेवक नितीन सपकाळ, मधुकर गोपनारायण, संजय किर्तक, अशोक शिरसाट, राजेश गावंडे, शेखर इंगळे, सुजित तेलगोटे, प्रशिस खंडारे, अंकित श्रीवास्तव, मोहन तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
...तर तीव्र आंदोलनमागणी दखल घेवून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.