अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या भीषणतेचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झालेला असताना आता अकोल्यातील गुन्हेगारीतही प्रचंड घट झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात तीन दिवसांचा लॉक डाउन जाहीर केल्यानंतर राज्य शासनानेही कलम १४४ लागू केले. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी जनता संचारबंदी जाहीर केल्यानंतर या दिवशी जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ तीन एफआयआर झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली.राज्य शासनाने लॉक डाउन केल्यानंतर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ दोन ते तीन एफआयआर झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारीत घट झाली असली तरी पोलिसांवर आता बंदोबस्ताचा मोठा ताण वाढला आहे. ३१ मार्चपर्यंत भारतीय दंड विधानाच्या कलम १४४ लागू केली आहे. या कलमानुसार आता पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक एकत्र येणे किंवा फिरायला जाताना दिसल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश आहे. यासोबतच कलम १८८ नुसार कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितल्यानंतर या कलमाचाही भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोरोनाच्या संदर्भात पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण वाढलेला असतानाच आता त्यांच्या ड्युट्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या आहेत. बंदोबस्तासाठी हजारो पोलीस तैनात असून, त्यांना रात्रंदिवस कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
अकोला : ‘लॉक डाउन’मध्ये गुन्हेगारीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 6:51 PM