अकोला: महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करण्यास मागील सात वर्षांपासून टाळाटाळ करणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानाला व पाच वर्षांपासून टॅक्स जमा न करणाºया मालमत्ताधारकाच्या घराला कुलूप ठोकण्याची कारवाई सोमवारी महापालिकेच्या जप्ती पथकाने केली.तुकाराम चौकातील हुंडीवाले कॉम्प्लेक्समधील दुकान व्यावसायिक मंगेश वाघमारे यांच्याकडे सात वर्षांचा २१ हजार ९१९ रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता. तसेच व्हीएचबी कॉलनीतील विजय हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी पी.एच. पाटोले यांच्याकडे मागील पाच वर्षांचा १५ हजार २४५ रुपये मालमत्ता कर थकीत होता. यासंदर्भात मनपाच्या कर वसुली विभागाने मालमत्ताधारक मंगेश वाघमारे, पी.एच. पाटोले यांना वारंवार सूचना, नोटीस जारी केल्या. तरीही संबंधितांनी टॅक्स जमा केला नाही. या प्रकरणाची दखल घेत मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशानुसार कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी वाघमारे व पाटोले यांच्या मालमत्तांना कुलूप लावण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई जप्ती पथक प्रमुख सै. मुमताज अली, सहायक कर अधीक्षक प्रशांत बोळे, प्रकाश कपले, शोभा पांडे आदींनी केली. मालमत्ता जप्तीची कारवाई टाळण्यासाठी अकोलेकरांनी थकीत कराचा भरणा तातडीने करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.सात वर्षांचा कर थकीत कसा?शहरातील काही मालमत्ताधारकांकडे मागील सहा ते सात वर्षांपासून कर थकीत आहे. एवढ्या प्रदीर्घ कालावधीपर्यंत मालमत्ता कर थकीत राहतोच कसा, तोपर्यंत मनपाचा मालमत्ता कर वसुली विभाग काय करतो, असे विविध प्रश्न या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत.