उरळ : पहिल्या पत्नीशी फारकत झालेल्या तरुणाने दुसऱ्या तरुणीची विवाह लावून देण्यास नकार देत असल्याच्या कारणावरून वृद्ध आईसह दोन भावांशी वाद घालून त्यांना मारहाण केल्याची घटना १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नजीकच्या नया अंदुरा येथे घडली.नया अंदुरा येथील आरोपी देवपाल भीमराव इंगळे याचा पहिला विवाह झाल्यानंतर पत्नीशी फारकत झाली होती. त्यानंतर १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता तो विशाखा नावाच्या तरुणीस घेऊन घरी आला. त्याने आई आशाबाई भीमराव इंगळे हिला त्याचा विवाह विशाखाशी लावून देण्याचा आग्रह धरला. आशाबाईने त्यास नकार दिला असता तो आईला मारहाण करू लागला. यावेळी धम्मपाल व संघपाल हे त्याचे दोघे भाऊ हे आईला सोडविण्यासाठी आले असता देवपालने धम्मपालच्या छातीला व पाठीला चावा घेतला. तसेच आईला शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत आशाबाई इंगळेने उरळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी देवपाल इंगळे व विशाखाविरुद्ध भादंविच्या ३२४, ५०४, ५०६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लाटकर, एएसआय हरिदास काळे व राम आंबेकर करीत आहेत.
लग्न लावून देण्यास नकार दिल्याने वृद्ध आईसह भावांंना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 1:45 AM