अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोलाच्यावतीने अमरावती विभागीय शालेय हॉकी स्पर्धा गुरुवारी घेण्यात आली. यामध्ये १४ वर्षांआतील मुले व मुलींच्या गटातील सामने खेळविण्यात आले. यामध्ये मुलांच्या गटात सहकार विद्या मंदिर बुलडाणा व मुलींच्या गटात राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, यवतमाळ संघाने विजेतेपद पटकावले. विजयी संघ १३ ते १६ सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.मुलांच्या गटात द्वितीय व तृतीय स्थान अनुक्रमे श्री साई माध्यमिक विद्यालय लोहारा व सैफियान उर्दू हायस्कूल अमरावती संघाने मिळविले. मुलींच्या गटात मांगिलाल शर्मा विद्यालय अकोला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय स्थान समर्थ पब्लिक स्कूल अकोला संघाने मिळविले. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी आर. जे. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून भूषण साळवी, विशाल निंबाळकर, रोहित तांबेकर, दीपक शुक्ला, स्वप्निल कमलाकर व धीरज चव्हाण उपस्थित होते. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षक व पंच यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मनीषा आखरे, मयूर निंबाळकर, अभिनंदन ठाकूर, शुभम निंबाळकर, चंदन ठाकूर, अभिजित उमाळे, अभिजित तिवळकर, ओम टाकसाळकर, यश पवार, जय शर्मा व आशिष उगवेकर यांचा समावेश होता.सामने समाप्तीनंतर बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. याप्रसंगी डॉ. प्रा. संतोष हुशे, उमेश बडवे, भूषण साळवे व प्रवीण नीळकंठ यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजक क्रीडा अधिकारी चारुदत्त नाकट, प्रशांत खापरकर, राजू उगवेकर, अजिंक्य धेवडे व गजानन चाटसे उपस्थित होते.