लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये पहिली ‘विकेट’ अकोल्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 01:51 PM2024-06-12T13:51:33+5:302024-06-12T13:52:14+5:30
पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत प्रदेश सचिव प्रशांत गावंडे सहा वर्षासाठी निलंबित
अकोला : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्यांवर प्रदेश स्तरावरून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यात पहिली विकेट अकोल्यातून गेली आहे. प्रदेश सचिव प्रशांत गावंडे यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्याचे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.
अकोला लोकसभा मतदासंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना ४ लाख १६ हजार ४०४ मते मिळूनही महायुतीतील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या कडून ४० हजार ६२६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासाठी काँग्रेस पक्षातीलच काही पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप डॉ. अभय पाटील यांनी करून मुंबईतील बैठकीदरम्यान प्रदेश काँग्रेस कमिटीकडे तक्रार केली होती.
त्याची गांभिर्याने दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्यकारिणीत सचिव पदावर कार्यरत असलेले प्रशांत गावंडे यांच्यावर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचा आदेश बुधवार, १२ जून रोजी प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे (प्रशासन व संघटन) यांनी काढला आहे.
आणखी काही नेते रडारवर
अकोला काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही. संघटनात्मक स्तरावर अनेक मतभेद असून, त्याचे पडसाद लोकसभा निडवडणुकीदरम्यान उमटले होते. त्यामुळे एकसंघ काँग्रेस असल्याचे भासवित काँग्रेस उमदेवराच्या विरोधात काम करणारे आणखी काही नेते पक्षाच्या रडारवर असल्याचे बोलल्या जात आहे. त्याबाबत प्रदेश स्तरावरून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी किती नेत्यांच्या विकेट जाणार याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मला पक्षाने कोणतीही नोटीस दिली नाही. माझ्यावर पक्षविरोधी कारवाईचा आरोप करण्यात आला आहे. त्याचे पुरावे पक्षाने द्यावे. नैसर्गिक न्याय हक्कानुसार मला माझी बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी. ते देऊ शकत नसेल तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नियमानुसार पक्ष कसा चालवायाचा हे समजून सांगितले पाहिजे.
- प्रशांत गावंडे, प्रदेश सचिव, काँग्रेस