अकोला : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्यात मका, ज्वारी आदी भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया १५ डिसेंबरपासून बंद आहे. मुदत संपण्यापूर्वीच ऑनलाइन नोंदणीचे पोर्टल बंद पडल्याने, भरड धान्य खरेदीची प्रक्रिया रखडली. त्यामुळे भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्यात ज्वारी व मका आदी भरड धान्य खरेदीसाठी शासन निर्णयानुसार १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून २ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल दराने ज्वारी व १ हजार ७६० रुपये प्रतिक्विंटल दराने राज्यात भरड धान्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे; परंतु भरड धान्य खरेदीसाठी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपण्यापूर्वीच १५ डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी बंद पडली. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून भरड धान्याची खरेदी करण्यात आली असली तरी, पोर्टल बंद पडल्याने ऑनलाइन नोंदणी बंद करण्यात आल्याने, राज्यात अनेक शेतकऱ्यांकडील भरड धान्याची खरेदी रखडली आहे. त्या अनुषंगाने आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात ज्वारी व मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीकरिता शासनाने मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱ्यांवर कमी दराने
भरड धान्य विकण्याची वेळ!
आधारभूत किंमत योजनेंतर्गत मुदत संपण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी बंद झाल्याने, अनेक शेतकऱ्यांकडील ज्वारी व मका खरेदीची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे बाजारात ज्वारी, मका आदी भरड धान्य कमी दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
अकोला जिल्ह्यात
१८०० क्विंटल मका खरेदी!
आधारभूत किंमत योजनेंतर्गत १५ डिसेंबरपर्यंत अकोला जिल्ह्यात ऑनलाइन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांकडून १ हजार ८०० क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी सांगितले.