अकोला : पातूर तालुक्यातील ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी तयार असलेल्या आलेगाव-नवेगाव १४ गावे, देऊळगाव-पास्टुल-१६ गावे प्रादेशिक योजनांचे पुनरुज्जीवन करून त्यातून पाणी पुरवठा घेण्यास तयार असल्याचा ठराव देण्यास ३० ग्रामपंचायतींनी कमालीची उदासीनता दाखविली आहे. शासनाच्या अटीनुसार ठरावच न आल्याने योजनांचे पुनरुज्जीवन अशक्य होण्याची चिन्हे आहेत.गावांमध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतून नियमितपणे पाणी मिळण्याची सोय होऊ शकते. त्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेकडे असलेल्या बंद पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी केली. त्यासाठी प्रादेशिक योजनेवर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींकडून त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. ग्रामपंचायतींनी चार अटींसह प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, गटविकास अधिकारी, संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी फेब्रुवारी अखेरपर्यंत ग्रामपंचायतींचे ठराव सादर करण्याचे बजावण्यात आले; मात्र आता मार्च अखेर आहे, तरीही प्रस्ताव प्राप्तच झाले नाही. तीन ते चार ग्रामपंचायतींना पाठविलेले प्रस्ताव मोघम आहेत. त्यामुळे या दोन योजनांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी आहे, आधीची यंत्रणा आहे, तरीही अंदाजपत्रक तयार करणे पाणी पुरवठा विभागाला अशक्य झाले आहे. ३० गावांना पाणी पुरवठ्यासाठी या दोन्ही योजनांचे पुनरुज्जीवन करण्यास शासन तयार असताना ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.
शासनाच्या अटींनुसारच हवा ठरावदेऊळगाव-पास्टुल १६ गावे, आलेगाव-नवेगाव १४ गावांना पाणी पुरवठ्याची सोय करण्यासाठी शासनाच्या अटीनुसार ग्रामपंचायतींना ठराव देणे बंधनकारक आहे. त्या अटीनुसार प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करून गावामध्ये पुरवठा सुरू करावा का, योजनेतून गावे वर्षभर पाणी घेतील का, ग्रामस्थांकडून पाणीपट्टीचा भरणा नियमितपणे केला जाईल का, गावांतर्गत पाणी पुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींची तयारी आहे का, या मुद्यांचा स्पष्ट ठराव घेऊन तो पाणी पुरवठा विभागाला सादर करावा लागणार आहे.
पंचायत समितीच्या आमसभेत गाजणार विषय!पंचायत समितीची आमसभा उद्या पातूर येथे आयोजित आहे. या सभेत संबंधित गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत. ग्रामपंचायतींकडून ठराव मागविण्यासाठीची यापूर्वीची बैठक आमदार सिरस्कार यांनी घेतली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार हा विषय गाजण्याची शक्यता आहे.