अकोला: सापाच्या दंशाने गंभीर झालेल्या १५ वर्षीय मुलीचा शनिवारी सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर नियमानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी नेणार तोच नातेवाइकांनी गोंधळ घातला. रात्री १० वाजतापर्यंत चाललेला हा गोंधळ डॉक्टरांच्या मध्यस्थीने शांत करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, एका मदरशातील १५ वर्षीय विद्यार्थिनीला सापाने दंश केल्याने तिला शनिवारी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असताना सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. कायद्यानुसार डॉक्टरांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी न्यावा लागणार असल्याचे सांगितले; परंतु तेवढ्यात नातेवाइकांनी अतिदक्षता कक्षातच राडा घालण्यास सुरुवात केली. शंभरच्या जवळपास लोकांनी गोंधळ घालत शवविच्छेदनाला विरोध केला. रात्री १० वाजतापर्यंत सुरू असलेला हा गोंधळ डॉक्टरांच्या मध्यस्थीने शांत करण्यात आला.