म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात सुमारे ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या रुग्णांसाठी सर्वाेपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १२, १३ मध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्याजवळ एका नातेवाईकास राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. घरून बोलावण्यात आलेल्या जेवणाच्या डब्यासह फळे, पाणी, ज्यूस रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी कोविड वॉर्डातूनच नातेवाईकांना प्रवेश दिला जात असल्याचा प्रकार सुरू असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकासाठी घातक असून, त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचेही मत रुग्णाने व्यक्त केले.
१२, १३ मध्ये जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता, मात्र परवानगी नाही
म्युकरमायकोसिसच्या रुग्णाच्या मते वॉर्ड क्रमांक १२, १३ मध्ये जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता आहे. मात्र, हा रस्ता रुग्णाच्या नातेवाईकांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसोबत एका नातेवाईकाला थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नातेवाईकाला घरून आलेला डबा किंवा फळे घेण्यासाठी वॉर्डाबाहेर जावे लागते. मात्र, त्यांना वॉर्ड क्रमांक २४ मधूनच ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नातेवाईकांनाही कोरोनाचा धोका आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- सारंग मालाणी, रुग्ण