अकोला: १४ वर्षाआतील बालकांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा असतानाही चोहोट्टा बाजार परिसरातील वीटभट्टय़ांवर बालकामगारांना कामावर ठेवल्या जात असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशमधून सिद्ध झाले. सहायक कामगार आयुक्त एस.जी. मुंढे यांच्या मार्गदर्शनात विशेष कृती दलाने मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास टाकळी बु. परिसरातील वीटभट्टीवर छापा घालून तीन बालकामगारांची मुक्तता केली. लोकमत चमूने २८ फेब्रुवारी रोजी गांधीग्राम, चोहोट्टा बाजार, गोपालखेड, करोडी, दहीहांडा परिसरातील वीटभट्टय़ांवर स्टिंग ऑपरेशन केले होते. स्टिंग ऑपरेशनदरम्यान या सर्वच वीटभट्टय़ांवर १४ वर्षाखालील आणि त्यावरील वयोगटातील मुले विटांचा भार वाहून नेताना दिसून आली. बालकांना कामावर ठेवणे हा गुन्हा असला तरी वीटभट्टय़ांवर हा गुन्हा दररोज घडतो आहे. चोहोट्टा बाजार परिसरातील वीटभट्टय़ांवर धारणी, मेळघाटामधील आदिवासी कुटुंब कामास आहेत. आदिवासी कुटुंबातीलही मुलांना त्यांचे आई-वडील म्हणा किंवा वीटभट्टी मालकाच्या आग्रहावरून कामावर ठेवल्या जाते. लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमुळे खडबडून जागे झालेल्या विशेष कृती दलाने मंगळवारी दुपारी टाकळी बु. येथील वीटभट्टी मालक निकेश प्रतापसिंग दैनेवाल याच्या वीटभट्टीवर छापा घातला असता, वीटभट्टीवर १३, १0 व ८ वर्षीय तीन बालके काम करताना मिळून आली.विशेष कृती दलाने बालकांना ताब्यात घेतले आणि दहीहांडा पोलीस ठाण्यात निकेश दैनेवाल याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी दैनेवालविरुद्ध बालकामगार अधिनियम १९८६ कलम ३, बालन्याय अधिनियम २000 चे कलम २६ व भादंवि ३७४ नुसार गुन्हा दाखल केला. मुक्त केलेल्या बालकामगारांची बालसुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली.
चोहोट्टा परिसरातील वीटभट्टीवरून तीन बालकामगारांची मुक्तता
By admin | Published: March 11, 2015 1:32 AM