अकोला : सर्वोपचार रुग्णालयात कोविडच्या गंभीर रुग्णांचा ताण वाढला आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. अशातच रविवारी पहाटे ऑक्सिजन टँकमधील लिक्विड ऑक्सिजन संपल्याने रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्याचा भार बॅकअप यंत्रणेवर आला. रुग्णांना निरंतर ऑक्सिजन पुरवठा व्हावा, यासाठी सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला ऐनवेळी अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडर मागवावे लागल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
सर्वोपचार रुग्णालयात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. दररोज सुमारे १० केएल ऑक्सिजनची गरज भासत आहे. रुग्णांना नियमित ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, या अनुषंगाने लिक्विड ऑक्सिजन सोबतच ऑक्सिजन सिलिंडरची मदत घेतली जात आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू असतानाच रविवारी सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधील लिक्विड ऑक्सिजन संपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॅकअप यंत्रणेत असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करण्यात आला. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडर मागवले होते. लिक्विड ऑक्सिजनचा टँकर रविवारी रात्री उशिरा अकोल्यात दाखल होणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
जीएमसी प्रशासनाची माेठी कसरत
सर्वोपचार रुग्णालयात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेने उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा साठा संपल्यावर जीएमसी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.