अकोला: शहरात रामनवमीच्या मध्यरात्री दारुच्या नशेत असलेल्या तीन जणांनी ३० मिनीटाच्या अंतराने दाेन हत्या केल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली हाेती. यातील एक आराेपी अल्पवयिन असल्यामुळे शुक्रवारी त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून रामदासपेठ पाेलिसांनी दाेन जणांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना २२ एप्रिल पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.
अतुल लक्ष्मण थाेरात (३०)रा.अशाेक नगर अकाेटफैल व राज संजय गायकवाड (१९)रा.बजरंग चाैक विजय नगर अकाेला अशी मृतकांची नावे आहेत. आराेपी मनिष शरद भाकरे (२१), ऋषीकेश दिपक आपाेतीकर (२०) दाेन्ही राहणार देशमुख फैल व एका अल्पवयीन आराेपीने दारुच्या नशेत हत्या केल्याची बाब पाेलिस तपासात समाेर आली. १७ एप्रिल राेजी मध्यरात्री दाेन जणांची हत्या करण्यात आली हाेती. अतुल थाेरात याच्या हत्येप्रकरणी अतुलचा मित्र शैलेश मधुकर वाघमारे (३२)रा.अशाेक नगर याने फिर्याद दिली हाेती. तसेच राज संजय गायकवाड याच्या हत्येप्रकरणी त्याचा भाऊ ऋषीकेश संजय गायकवाड याने रामदासपेठ पाेलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पाेलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. उपराेक्त दाेन आराेपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना २२ एप्रिल पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.