अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोविड रुग्णांचे रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर विकणाऱ्या एका परिचारिकेसह वॉर्डबॉयला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. या दोघांकडून एक इंजेक्शन जप्त करण्यात आले असून या दोघांनी आणखी १६ इंजेक्शनची हेराफेरी केल्याची माहिती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. तेथील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठाही शासनाकडून करण्यात येते. या पुरवठ्यातील रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना न देता त्याची काळ्याबाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असता सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्डबॉय ऋषिकेश ऊर्फ सोनू देवसिंग चव्हाण (२३) रा. राजपुतपुरा व संगीता प्रशांत बडगे (३१) राहणार डाबकी रोड या दोघांनी सुमारे १६ इंजेक्शनची हेराफेरी केल्याची माहिती उघड झाली. त्यांना शुक्रवारी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता या दोघांनी शुक्रवारीही एक इंजेक्शन बाहेर विकल्याची माहिती आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे आरोपी असण्याची शक्यता असून त्यांच्या मार्गदर्शनातच शासनाच्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याची माहिती आहे.
जीएमसीच्या अधिकाऱ्यांची मूकसंमती?
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक धावाधाव करीत आहेत. हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांची तडफड सुरू आहे; मात्र ज्या ठिकाणी सुमारे २ हजारांपेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन ठेवण्यात आले त्या जीएमसीतून इंजेक्शनचा मोठा प्रमाणात काळाबाजार सुरू होता. जीएमसीचे वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी असल्याची चर्चा आहे. त्यांच्या मूकसंमतीनेच महागड्या इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.