अकोला : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोना प्रतिबंधक रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी शुक्रवारी ‘ऑनलाइन’ पध्दतीने घेतला. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून, मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यानुषंगाने अमरावती विभागीय आयुक्तांनी ‘व्हिडिओ काॅन्फरन्सिंग’द्वारे जिल्ह्यात शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेतला. रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा कोरोनाबाधित रुग्णांसाठी योग्य पध्दतीने वापर होतो की नाही, यासंदर्भातही विभागीय आयुक्तांनी माहिती घेतली. कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची उपलब्धता तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण व कोरोना चाचण्या व उपचार सुविधांबाबतही विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना तसेच उपचार सुविधांच्या विषयाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना यावेळी दिली.
रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठ्याचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 10:33 AM