काेराेनाचा झपाट्याने फैलाव हाेत असताना अकाेलेकरांना कवडीचेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. काेराेनामुळे ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्तींचा मृत्यू हाेत असून कुटुंबातील एका सदस्याला काेराेनाची लागण झाल्यास संपूर्ण कुटुुंब बाधित हाेत आहे. परिस्थितीचे भान न ठेवता नागरिक बाजारपेठेत, सार्वजनिक ठिकाणी फिरताना व आपसात चर्चा करताना दिसून येत आहेत. काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच व्यावसायिकांना दुकाने खुली ठेवण्यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतची परवानगी देण्यात आली. यादरम्यान, बाजारपेठेतील काही व्यावसायिक नियम पायदळी तुडवित असल्याची बाब मनपाच्या निदर्शनास आली आहे. सायंकाळी ५वाजेनंतरही काही व्यावसायिक दुकाने खुली ठेवत असून त्यामध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत असल्याने शनिवारी मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी अशा व्यावसायिकांना कारवाईचा इशारा दिला आहे.
...तर ५०० रुपये दंड
काेराेनाच्या प्रसाराला नागरिकांचा बेफिकीरपणा कारणीभूत ठरत आहे. नागरिकांना नियमांची जाणीव असतानादेखील सायंकाळी ५ नंतरही दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येते. त्यामुळे तपासणीदरम्यान ग्राहक आढळल्यास त्याला तब्बल ५०० रुपये दंड जमा करावा लागणार आहे.