अकोट : मनुष्याने आपले कर्तव्य निष्ठापूर्वक, श्रद्धा व भक्तिभावपूर्वक पार पाडणे, हेच खरे ईश्वरीय कार्य आहे. निष्काम भक्ती, कर्म हाच परम सुखाचा मार्ग आहे. गुरुमाउली श्री संत वासुदेव महाराज यांनी हा सुखाचा मार्ग दाखविला, म्हणूनच गुरुमाउलींच्या पुण्यस्मरणाने प्रत्येकाचे आत्मबळ वाढते, असे भावोद्गार हभप गोपाळ महाराज उरळकर यांनी श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे काढले.
श्रद्धासागर येथे गुरुमाउलीं श्री संत वासुदेव महाराज पुण्यतिथी सोहळ्यातील कीर्तनात गोपाळ महाराज बोलत होते. आषाढी एकादशी हे पवित्र पर्व आहे. या पर्वात वारकऱ्यांचे ध्यान विठ्ठलाकडे लागलेले असते, परंतु गुरुमाउलीच्या पुण्यस्मरणात साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडते, त्यासाठी भाव विठ्ठलरूप असला पाहिजे, असे सांगून पंढरपूर वारीचे माहात्म्य विशद केले. कोविड-१९ नियमांचे पालन करीत कीर्तनाला भाविक उपस्थित होते. सर्वप्रथम गुरुमाऊली श्री संत वासुदेव महाराजांचे भावपूर्ण पुण्यस्मरण करण्यात आले. पहाटे गुरुमाउलींचा अभिषेक व पूजन संस्थेचे सहसचिव मोहनराव जायले यांच्या हस्ते पार पडले. रात्री ९.४५ वाजता ‘श्रीं’च्या निर्वाणसमयी दीपोत्सव व महाआरती पार पडली. (फोटो)
श्रद्धासागर परिसरात वृक्षारोपण
गुरुमाउली पुण्यतिथीनिमित्त श्रद्धासागर येथे सोहळा सुरू आहे. यानिमित्ताने परिसरात हभप गोपाळ महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्राचार्य गजानन चोपडे, नंदकिशोर हिंगणकर तथा धनंजय वाघ, संस्थेचे व्यवस्थापक अमोल मानकर व कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.