अकोला: पाणलोट आधारित पावसाचे व जमिनीचे व्यवस्थापन काळाची गरज असून, पाणी संकलनासाठी छोटे नाले, नद्यांची अद्ययावत माहिती सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेण्याची आवश्यकता आहे. याकरिता स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ एक आराखडा तयार करू न शासनाला शिफारस करणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठात पाणलोट विकास क्षेत्र व इतर ठिकाणी भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन प्रकल्पावर काम सुरू आहे. पाच वर्ष चालणार्या या प्रकल्पांतर्गत कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. यामुळे नाल्याच्या भोवतालच्या विहिरींची व जमिनीतील पाण्याची पातळी वाढली असल्याचे भूगर्भ पाणी मोजणी यंत्राद्वारे त्यांना पाहता आले. या प्रकल्पामुळे या भागातील पिकांना संरक्षित ओलिताची सोय झाली आहे. असेच प्रकल्प राज्यात प्रत्येक ठिकाणी राबविल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने व व्हीएनएमकेव्हीने एक आराखडा तयार करू न राज्य शासनाला द्यावा, असे प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाला रिमोट सेन्सिंगद्वारे राज्यातील प्रत्येक छोट्या-मोठय़ा नाल्यांची माहिती घेऊन व्यवस्थान करावे लागणार आहे. पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन प्रकल्पाच्या मूल्यमापन समितीचे अध्यक्ष डॉ.बी. वेंकटसरलू यांनी यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते प्रत्येक कार्यशाळेत या संबंधी शास्त्रज्ञ इत्यादीचे प्रबोधन करीत आहेत. आयसीएआरने मूलस्थानी जलसंवर्धनासाठी कृषी विद्यापीठांना सहकार्य केले असून, राज्यातील कृषी विद्यापीठात जल व्यवस्थापनावर काम केले जात आहे. राज्य शासनाने राज्यातील छोट्या-मोठय़ा नाल्यांची रिमोट सेन्सिंगद्वारे माहिती घेऊन पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापनावर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह व्हीएनएमकेव्हीने एक आराखडा करू न राज्य शासनाला शिफारस करावी, अशी सूचना या विद्यापीठाला केली आहे.
जलव्यवस्थापनाच्या ताळेबंदासाठी रिमोट सेन्सिंगचा वापर करण्याची गरज!
By admin | Published: October 07, 2015 2:03 AM