लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारा इन्कम टॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’ दूर करावा, त्यानंतर सहकार नगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढल्या जाईल. मूठभर मालमत्ताधारकांची मर्जी राखून अतिक्रमित इमारती कायम ठेवल्या जात असतील, तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कदापि हात लावून देणार नसल्याचा सज्जड दम महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाला गोरक्षण रोड रहिवासी शिवप्रेमींच्यावतीने शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला. नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंत ३ हजार २00 मीटर अंतराच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम केले जात असले, तरी रस्ता रुंदीकरणाच्या आड येणार्या अतिक्रमित मालमत्तांना दूर करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची असल्याचे गोरक्षण रोड रहिवासी शिवप्रेमींच्यावतीने राजेंद्र पातोडे यांनी सांगितले. महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या अतिक्रमित मालमत्तांचे मार्किंग करून मनपाने संबंधितांना नोटीस बजावत न्यायालयात ‘कॅवेट’ दाखल केला. राजकीय दबावतंत्रामुळे ‘बॉटल नेक’ कायम ठेवून उर्वरित रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. सद्यस्थितीत सहकार नगर चौकापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. सहकार नगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचा दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे आधी इन्कम टॅक्स चौकातील ‘बॉटल नेक’ दूर करावा, त्यानंतरच शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्या जाईल, अन्यथा पुतळ्याला हात लावल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा उपस्थित शिवप्रेमींच्यावतीने देण्यात आला. यावेळी शिवसेना नगरसेवक मंगेश काळे, मनोहर हरणे, विनायकराव पवार, पंकज जायले यांनी मते व्यक्त केली. पत्रकार परिषदेला अजय गावंडे, पंकज साबळे, अविनाश पाटील, अँड. राजेश जाधव, डॉ. श्याम शर्मा, तुषार जायले, प्रकाश देशमुख, डॉ. नितीन गायकवाड, अविनाश मोरे, सुरेंद्र विसपुते, नवीन धोटकर, शरद क ोकाटे, देवेश पातोडे, सचिन शिराळे, नीतेश किर्तक, रवी वैराळे, नीलेश निकम, राजकुमार दामोदर, नवीन भोटकर आदींसह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.
अन्यथा ‘पीडब्ल्यूडी’ विभागावर मोर्चागोरक्षण रोड रहिवासींच्यावतीने इन्कम टॅक्स चौकातील बॉटल नेक दूर करून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ला सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. आठव्या दिवशी संबंधित अधिकार्यांना कासव छाप अगरबत्ती भेट देऊन त्यानंतर थेट मोर्चा काढणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.