अकोला : जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित असलेल्या समस्या येत्या पंधरा दिवसांत निकाली काढून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिक्षकांच्या सेवाविषयक समस्यांसंदर्भात तालुकानिहाय आढावा घेत, प्रलंबित समस्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. काही प्रकरणांत जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करण्याचे सांगत शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना दिले.यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार, सर्व गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, विस्तार अधिकारी, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.शिक्षकांच्या ‘या’ प्रश्नांवर झाली चर्चा!या बैठकीत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत विषय शिक्षकांची पदस्थापना तातडीने करण्यात यावी, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, चट्टोपाध्याय वेतनश्रेणी व निवडश्रेणीचे प्रस्ताव मंजूर करणे, अंशदायी पेन्शन योजनेत कपात करण्यात आलेल्या रकमेच्या पावत्या देण्यात याव्या, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या पदस्थानेसंदर्भात कार्यवाही करण्यात यावी तसेच माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्यात आले, अशा शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून काढण्यात यावे, माध्यमिक शाळांना ‘आरटीई’ची मान्यता देण्यात यावी, शिक्षकेतर कर्मचाºयांच्या समायोजनासंदर्भात कार्यवाही करावी, वैद्यकीय परिपूर्ती देयके निश्चित कालमर्यादेत अदा करावी, यासह इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.