अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाद्वारे 75 हजार जागांची नोकर भरती करण्यात येत आहे. या नोकर भरतीचे नियुक्ती आदेश मान्यवरांच्या हस्ते बेरोजगारांना दिल्या जात आहेत. दरम्यान, शासन निर्णयानुसार शासकीय व निमशासकीय सेवेत दिव्यांग बांधवांसाठी चार टक्के पदे आरक्षित करण्यात आली असून या पदांवर दिव्यांग बांधवांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी अकोला व अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी गुरुवारी राहुल गांधी यांची वाडेगाव येथे भेट घेतली.
काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे गुरुवारी सकाळी 11 वाजता बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे आगमन झाले. यावेळी त्यांना निवेदन देऊन समस्या निकाली लावण्याच्या मागणीसाठी विविध क्षेत्रातील सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. शासकीय व निमशासकीय सेवेत दिव्यांग बांधवांना बांधवांसाठी चार टक्के जागा आरक्षित आहेत.
या संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्णय शासन निर्णय प्रसिद्ध केले असून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा दिव्यांग बांधवांच्या आरक्षणासंदर्भात शासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत असे असताना देखील शासकीय सेवेत पदभरती प्रक्रिया राबवली जात असताना दिव्यांग बांधवांच्या नियुक्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बाब समोर येत आहे.
या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली अकोला व अमरावती जिल्ह्यातील असंख्य दिव्यांग बांधवांनी राहुल गांधी यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, किशोर बोरकर यांच्यासह अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी दिव्यांग सेलचे सचिन शेजव, प्रवीण भिवरीकर, रविन्द्र वानखडे, हरी मदने आदि अवस्थित होते.
संजय गांधी निराधार योजनेची मदत वाढवून द्यावी!संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना प्रति महिना एक हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु सदर मानधन अत्यल्प असल्यामुळे दिव्यांगांची फरफट होत आहे. या रकमेत वाढ करावी अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे करण्यात आली.