अकोला : कर्तव्यात कसूर आणि मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याने, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना सदस्यांनी २४ ऑगस्ट रोजी ग्रामविकास मंत्र्यांकडे दाखल केली.
जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार पाडण्यात कसूर करीत असून, मनमानी पद्धतीने कारभार करीत आहेत. पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकासकामांसह निविदा स्वीकृतीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्तव्यात कसूर आणि मनमानी पद्धतीने करणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका जिल्हा परिषदेतील शिवसेना सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे दाखल केली. अध्यक्षांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ग्रामविकास मंत्र्यांकडे लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे.
याचिकाकर्ते असे आहेत सदस्य!
जिल्हा परिषद अध्यक्षांना अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या सहा सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे दाखल केली. त्यामध्ये प्रशांत अढाऊ, गोपाल भटकर, गणेश बोबडे, संदीप सरदार, वर्षा वजिरे, सुनीता गोरे या जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे.
विरोधकांनी मला जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून दूर करण्याबाबत ग्रामविकास मंत्र्यांकडे याचिका दाखल केल्याचे कळले आहे. यासंदर्भात नोटीस मिळाल्यानंतर योग्य ते उत्तर देण्याची तयारी आहे.
-प्रतिभा भोजने
अध्यक्ष, जिल्हा परिषद, अकोला
जिल्हा परिषद अध्यक्ष कर्तव्यात कसूर व मनमानी पद्धतीने कारभार करतात. पाणीपुरवठा योजना आणि विकासकामांच्या निविदा स्वीकृतीचे प्रस्ताव फेटाळण्यात येतात. त्यामुळे अध्यक्षांना पदावरून हटविण्याबाबतची याचिका आम्ही ग्रामविकास मंत्र्यांकडे दाखल केली.
-डॉ. प्रशांत अढाऊ
सदस्य, जिल्हा परिषद तथा याचिकाकर्ते