अकोला : पुणे येथील सावित्रीबाई फुलेविद्यापीठाचे नामांतरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेपुणेविद्यापीठ, असे करण्याची मागणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षण परिषदेचे सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे नामांतरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर, असे करण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केल्याच्या वृत्ताचा हवाला देऊन डॉ. खडक्कार यांनी ही मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खडक्कार म्हणतात, की तत्कालीन पुणे विद्यापीठाचे नामांतरण ९ आॅगस्ट २०१४ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले होते. ब्रिटीश राजवटील महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करण्यात महत्वाची भूमिका असलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठास देऊन हा एकप्रकारे त्यांचा गौरव करण्यात आला होता. आता यामध्ये थोडासा बदल करून, विद्यापीठास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे असे करण्यात यावे, अशी विनंती खडक्कार यांनी पत्रातून केली आहे.