अकोला: मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज भरणे, मागील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज नूतनीकरण करून पडताळणी करण्याकडे शाळा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. ४१ हजार विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ९२६ विद्यार्थ्यांच्या अर्जांचे नूतनीकरण तर सोडाच पडताळणीसुद्धा झाली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने त्यासाठी १५ आॅक्टोबरपर्यंत मुदत वाढविली आहे. यानंतरही विद्यार्थ्यांच्या अर्जांचे नूतनीकरण आणि नूतनीकरण केलेल्या अर्जांची पडताळणी न केल्याच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी शाळांची राहील, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे.अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज भरणे, मागील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज नूतनीकरण करणे व भरलेले अर्ज स्वत: काळजीपूर्वक तपासून पडताळणी करण्यासाठी १५ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीपूर्वी मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत; परंतु त्याकडे मुख्याध्यापक, शाळा दुर्लक्ष करीत आहेत. आतापर्यंत २१ हजार ९२६ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांचे नूतनीकरण आणि पडताळणी करण्यात आलेली नाही. तसेच २0१७-१८ पासून या योजनेसाठी तहसीलदार यांचे लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडण्याबाबतच्या सूचना सुरुवातीपासून देण्यात येऊनसुद्धा या बाबीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांची संकलित यादी व उत्पन्नाचे प्रमाणपत्र ताबडतोब जिल्हा कार्यालयात पडताळणीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ७ आॅक्टोबरपर्यंत सादर करावेत. असे सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी कळविले. (प्रतिनिधी)