अकोला: पैलपाडा ते कुरणखेड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. तसेच पैलपाडानजीक असलेल्या काटेपूर्णा नदीवरील जुन्या पुलाची दूरवस्था झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन जुन्या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी करीत युवा स्वाभिमानी पक्षातर्फे गुरुवार, दि. २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यास युवा स्वाभिमानी पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही याप्रसंगी देण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मौजे पैलपाडा येथे राष्ट्रीय महामार्गावर बस स्टँड व सर्व्हिस रोड देण्यात यावा, तसेच काटेपूर्णा नदीवरील पुलावरील ( पैलपाडा - कुरणखेड) जुन्या पुलाची डागडुगी व दुरुस्ती करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेशित करावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सागर खंडारे, जिल्हा महासचिव सुशील तेलगोटे, तालुका अध्यक्ष शुभम कातखेडे, पोलीस पाटील दिपक नागे, प्रदीप मेश्राम, महानगर अध्यक्ष सुमित पाखरे, महानगर उपाअध्यक्ष प्रशिश शिरसाट, अमित गजभिये, कपिल मेश्राम, अक्षय शिरसाट यांच्यासह पैलपाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.