अकोला - अकाेट तालुक्यातील कालवडी येथील पोल्ट्री फार्ममधील मृत पक्ष्यांचे अहवाल एच ५ एन१ करिता निगेटिव्ह आले आहे. तसेच अकोटजवळील खासगी पाळलेल्या पक्ष्यांचे, रामापूर येथे आढळलेल्या मृत मोराचा अहवालही निगेटिव्ह आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने यांनी दिली. दरम्यान, अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे बर्ड फ्लूसंदर्भात जारी करण्यात आलेल्या चार अधिसूचनांचे आदेश रद्द करण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नियमित रोगनिदान सर्वेक्षणअंतर्गत ३५२ नमुने पाठविण्यात आले आहेत. रोगनिदानाकरिता पाठविलेल्या मृत १३ कुक्कुट पक्ष्यांपैकी पिंपळगाव चांभारे ता. बार्शीटाकळी व कुरणखेड ता. अकोला येथील नमुने एच५ एन१ करिता पॉझिटिव्ह आले. दोन्ही ठिकाणी केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे विविध ऑपरेशन पशुसंवर्धन विभागातर्फे पूर्ण करण्यात आले आहे. पिंपळगाव चांभारे येथील कुक्कुटपालकांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.
अकोट तालुक्यामधील ग्राम कालवडीजवळील कुक्कुट फार्ममधील २४३५ पक्षी मृत पावले होते. त्या कुक्कुट फार्ममधील मृत पक्ष्यांचे अहवाल एच५एन१ करिता निगेटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे अकोट जवळील परसातील कुक्कुट फार्ममधील १०८ पक्षी मृत पावले होते. त्याचादेखील अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे रामापूर येथील शेतशिवारात मृत पावलेल्या मोराचाही अहवाल एच५एन१ करिता निगेटिव्ह आला आहे.
जंगली व इतर पक्षी व कावळे यांचे आतापर्यंत १७ नमुने पुणे येथे पाठविले असून त्यांचा अहवाल अजून प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत एकूण १५ अधिसूचना बर्ड फ्लूसंदर्भात काढण्यात आल्या होत्या. त्यापैकी चार अधिसूचनांचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यात अकोट, कालवडी ता. अकोट, रामापूर ता. अकोट व चाचोडी ता. अकोला या क्षेत्रांचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली.
पोल्ट्री फार्मधारकांनी कोंबड्याचे खुराडे व गटारे, नाल्या तसेच पशु- पक्ष्यांचा वावर असलेल्या भिंती व जमिनीवर सोडियम कार्बोनेट(धुण्याचा सोडा) यांचे एक लिटर पाण्यामध्ये सात ग्रॅम द्रावणाची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. दर १५ दिवसांच्या अंतराने तीन वेळेस फवारणी करावी. त्याचप्रमाणे पोल्ट्री फार्मवर स्वच्छता ठेवावी व जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी. स्तलांतरित पक्षी यांचा पोल्ट्रीफार्म सोबत संपर्क येवू नये, याची दक्षता घ्यावी. तरी नागरिकांनी घाबरून न जाता अंडी, चिकन उकळून खावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.