संतोष येलकर/अकोला: अत्यल्प पावसामुळे विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर गावागावात भेटी देऊन, संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या भावना कळवा, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना केल्या आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील २५ हजार ६४ गावांमधील पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी निघाली. याशिवाय नोव्हेंबर-डिसेंबर व फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानापोटी शेतकर्यांना मदत व सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, यावर्षीच्या पावसाळ्यातही राज्यातील बहुतांश भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागात पेरण्या उलटल्या असून, दुबार पेरणीपासूनही शेतकर्यांना फारशा आशा नाहीत. भरीस भर, काही जिल्हय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध नाही. राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत काही निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती शेतकर्यांना देण्यासाठी, तसेच संकटात सापडलेल्या शेतकर्यांना धीर देण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात संबंधित पालकमंत्र्यांनी काही गावांना प्रत्यक्ष भेटी द्यावी आणि शेतकर्यांच्या भावना कळवाव्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना १0 ऑगस्ट रोजी एका पत्राद्वारे दिल्या. *प्रत्यक्ष गावभेटीतून पालकमंत्री देणार योजनांची माहिती! मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हय़ांचे पालकमंत्री संबंधित जिल्हय़ातील काही गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन, शेतकर्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती देऊन संकटात सापडलेल्या शेतकर्यांना धीर देणार आहेत. २0१४-१५ मध्ये शेतकर्यांनी घेतलेल्या अल्पमुदती कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर करून, कर्जाचा हप्ता परत करणार्या शेतकर्यांच्या कर्जावरील व्याज २0१५-१६ या वर्षात माफ करण्यात येणार आहे. त्यापुढील चार वर्षांचे ६ टक्के दराने होणारे व्याज शासनामार्फत बँकांना देण्यात येणार आहे.
संकटात सापडलेल्या शेतक-यांच्या भावना कळवा!
By admin | Published: August 18, 2015 1:29 AM