महापालिकांमध्ये सहायक आयुक्त तसेच नगर परिषद, नगरपालिकांमध्ये मुख्याधिकारी पदावर मागील तीन वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी नियुक्त करण्याचा निर्णय घेत नगर विकास विभागाने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली हाेती. ही बदली प्रक्रिया राबविताना संबंधित अधिकाऱ्यांना प्रथमच नियुक्तीचे ठिकाण विचारण्यात आले हाेते. यादरम्यान, विनंती अर्जानुसार नियुक्ती मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अर्जांवर ३१ ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडून निर्णय घेतला जाणार हाेता. परंतु या विभागाने विनंती अर्ज बाजूला सारल्याची माहिती असून, यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची कुचंबणा झाली आहे.
पदे रिक्त; कामकाज प्रभावित
ज्या नगर परिषदा, नगरपालिकांमधील मुख्याधिकारी पदे रिक्त आहेत, अशा ठिकाणी नियुक्त हाेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अर्जांची संख्या सुमारे ३८ पेक्षा जास्त आहे. नागरी स्वायत्त संस्थांमधील पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित झाले आहे. त्या ठिकाणी अधिनस्थ अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभार देउन प्रशासकीय कामकाज निकाली काढल्या जात आहे.