अकोला: कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने गोवंश बांधून ठेवणाऱ्या दोघांना अटक करून पातूर व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी २८ गोवंशाची सुटका केली. तसेच १२ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय गोपीलाल मावळे हे २१ ऑगस्ट रोजी पातूर येथे गस्तीवर असताना त्यांना कत्तलीच्या उद्देशाने गोवंश बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकासह छापा घातला असता, मुजावरपुरा पातूर येथे फकीरा याच्या गोठ्यात मोहम्मद असलम शेख हाशम (४०) रा. उर्दु शाळा नं. २ जवळ आणि शेख वाजीद शेख इब्राहीम (३०) रा. मुजावर पुरा, पातुर) यांनी गोवंश बांधून ठेवल्याचे आढळून आले.
गोवंशाना चारा-पाण्याशिवाय निर्दयतेने बांधल्याचे दिसून आले तसेच त्यांचे अंगावर ठिकठिकाणी जखमांचे निशाण दिसून आले. या ठिकाणी हजर आलेले मोहम्मद असलम शेख हाशम,आणि शेख वाजिद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर त्यांनी गोवंशाच्या मालकीविषयी माहिती दिली नाही. पोलिसांनी सुटका केलेल्या २८ जनावरांची अंदाजे किंमत १२ लाख रूपये आहे.
२८ गोवंशांना आदर्श गोरक्षण संस्थानच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात सपोनि कैलास भगत, दत्तात्रय ढोरे, सुलतान पठाण, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, अविनाश पाचपोर, महेंद्र मलिये, विशाल मोरे, सतिश पवार व नफिस शेख यांनी केली.