अकोला : खडकी येथील शेतातील एका ७० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या मसन्या उद या प्राण्याला सर्पमित्र बाळ काळणे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवून जीवनदान दिले.खडकी येथील नागे यांच्या शेतातील सत्तर फूट खोल विहिरीत मसन्या उद पडला होता. नागे यांनी मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे यांना कळविले. त्यांनी हा घटनाक्रम त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी ओवे व गीते यांना सांगितला. त्यानंतर बाळ काळणे, प्रवीण सरप, अनिल चौधरी हे तातडीने घटनास्थळी गेले. तेथे गेल्यानंतर बाळ काळणे व अनिल चौधरी हे क्रेनच्या सहाय्याने विहिरीत उतरले. मसन्या उदला काहीच इजा होऊ न देता शिताफीने पकडून पोत्यात टाकले व वर आणले. तब्बल दीड तास हे ‘रेस्क्यू आॅपरेशन’ चालले. कर्करोगावर उपचार सुरू असतानाही बाळ काळणे धाडसी वन्यजिव सेवा करीत आहेत. याप्रसंगी श्रीकांत गावंडे, मनिष बुंदेले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.मसन्या उद हा स्वच्छता दूतमसन्या उद हा दुर्मिळ प्राणी असून, तो स्मशान भूमित राहतो. कुजलेल्या मांसाचे तुकडे खाऊन तो परिसर स्वच्छ राखतो. त्यामुळे त्याला स्वच्छता दूत म्हटल्या जाते. आतापर्यंत आपण चार मसन्या उदला जीवनदान दिल्याचे बाळ काळणे यांनी सांगितले.