अकोला: जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरंपच पदांसाठी गत महिन्यात घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंच पदांच्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सदस्य निवडून आले नसल्याने या प्रवर्गातील रिक्त राहिलेल्या १६ सरपंच पदांची नव्याने आरक्षण सोडत मंगळवारी जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालयांत काढण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १६ सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गत ९ व ११ फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये सरपंच पदांच्या आरक्षणानुसार जिल्ह्यात २०८ सरपंचांची निवड करण्यात आली होती.तर आरक्षणानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सदस्य निवडून आले नसल्याने, जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, अकोला, बाळापूर, बार्शिटाकळी व पातूर या सहा तालुक्यातील अनूसूचित जाती प्रवर्गातील ३ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील १३ अशा एकूण १६ सरपंचांची पदे रिक्त राहिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या १६ सरपंच पदांची आरक्षण सोडत नव्याने जिल्ह्यातील संबंधित तहसील कार्यालयांमध्ये १६ मार्च रोजी काढण्यात आली असून, सरपंच पदांचे नव्याने आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त सरपंच पदांसाठी लवकरच निवडणूक घेण्यात येणार आहे.
सरंपच पदांचे आरक्षण!
तालुका ग्रा.पं. प्रवर्ग
तेल्हारा चांगलवाडी अनूसूचित जाती
तेल्हारा सौंदळा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
तेल्हारा वांगरगाव नागरिकांचामागासवर्ग प्रवर्ग स्त्री
अकोट चोहोट्टा अनुसूचित जमाती
अकोट सावरा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री
अकोट मक्रमपूर नागरिकांचा मागासवर्ग‘ प्रवर्ग
अकोट मंचनपूर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री
अकोट पातोंडा अनुसूचित जमाती
अकोला खांबोरा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री
बाळापूर अंत्री मलकापूर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
बार्शिटाकळी लोहगड अनूसूचित जाती
पातूर चरणगाव नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री
पातूर दिग्रस खुर्द नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री
पातूर आलेगाव नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
पातूर विवरा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री
पातूर चतारी अनुसूचित जाती स्त्री