अकोला: जुलै ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणार्या जिल्ह्यातील २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवारी सातही तहसील कार्यालयांमध्ये काढण्यात आली. या आरक्षण सोडतीवर ५ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले असून, प्राप्त होणार्या आक्षेपांवर ६ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये सुनावणी होईल. जुलै ते डिसेंबर या कालावधीत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना आणि प्रभागनिहाय जागा आरक्षित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील २३४ ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना निश्चित करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत सातही तहसील कार्यालयांमध्ये बुधवारी काढण्यात आली. ग्रामपंचायतनिहाय काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये प्रभागनिहाय लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण इत्यादी प्रवर्गाच्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. ग्रामपंचातींची प्रभागरचना आणि प्रभागनिहाय आरक्षणाबाबत येत्या ५ फेब्रुवारीपर्यंंत संबंधित तहसीलदारांकडे हरकती दाखल करता येतील. हरकतींवर ६ फेब्रुवारी रोजी उपविभागीय कार्यालयांमध्ये सुनावणी घेण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यातील २३४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत
By admin | Published: January 29, 2015 1:14 AM