अकोला : राज्य सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसींवर अन्याय होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यावर अखिल भारतीय माळी महासंघाने आक्षेप घेतला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माळी महासंघाच्यावतीने आगामी दि. २० सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुभाष सातव यांनी शासकीय विश्रामगृहात दि.१२ सप्टेंबरला ५.३० वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाने ओबीसींविरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्यास संपूर्ण राज्यात ओबीसी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही याप्रसंगी पत्रकार परिषदेत देण्यात आला. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देता इडब्ल्यूएससारखे आरक्षण वाढवून देणार असतील, तर त्याला अखिल भारतीय माळी महासंघाचा विरोध नसेल, असेही सातव यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वास्थ व राष्ट्रीय सरचिटणीस सुभाष सातव, महाराष्ट्र राज्य संघटक गणेश काळपांडे, जिल्हा अध्यक्ष ॲड. प्रकाश दाते, सचिव मनोहर उगले, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नितीन देऊळकार आदी उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध
जालना जिल्ह्यात अंतरवली सराटे येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांकडून उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठीमार झाल्याची घटना घडली. या घटनेचा अखील भारतीय मराठा महासंघ निषेध करते, असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.