अकोला : आगामी २७ आॅक्टोबर रोजी असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेत ‘नो रूम्स’ची स्थिती आहे. स्लीपर कोचपासून तर एसीपर्यंत रेल्वेत आरक्षण नसल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे खासगी वाहतूक या काळात महागली आहे.दिवाळीच्या निमित्ताने लोक आपापल्या गावांकडे सण साजरा करण्यासाठी जातात. त्यामुळे मोठा वर्ग प्रवास करीत असतो. त्याचा मोठा परिणाम रेल्वे आरक्षणावर झाला आहे. २० आॅक्टोबरपासून तर १० नोव्हेंबर २०१९ पर्यंत अप-डाउन मार्गावरील रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी झाली आहे. सर्वच गाड्यांमध्ये शंभरच्या पलीकडे ‘वेटिंग लिस्ट’ आहे. दिवाळीनिमित्त अतिरिक्त गाड्या सोडण्यात याव्या म्हणून निवेदन करण्यात येत आहे.सीएसटी ते नागपूर वन-वे विशेष रेल्वेप्रवाशांची गर्दी आणि मागणी लक्षात घेता, मुंबई-नागपूर (वन वे) सुपरफास्ट विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे मंडळाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूरसाठी ०२०३१ गाडी धावणार आहे. १३ आॅक्टोबर ही गाडी ००.२० वाजता प्रस्थान करून त्याच दिवशी १५.१० ला नागपूर येथे पोहोचेल.या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा असेल. त्यात १४ स्लीपर श्रेणी, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आरक्षण राहणार आहे.
आरक्षण फुल्ल; मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेत ‘नो रूम्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 3:56 PM