अकाेला : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महिला प्रवर्गातून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या १५ पैकी आठ जागा, अनुसूचित जमातीच्या दाेनपैकी एक व सर्वसाधारण प्रवर्गातील ७४ पैकी ३७ अशा एकूण ४६ जागांचे आरक्षण मंगळवारी साेडतीद्वारे जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवनमध्ये महिलांसाठी ५० टक्के राखीव आरक्षणानुसार साेडत प्रक्रिया पार पडली. दरम्यान, ९१ पैकी ४६ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असल्या, तरीही सर्वसाधारण प्रवर्गातील उर्वरित ३७ जागांवर महिलांना निवडणूक लढवता येणार असल्याने महापालिकेत महिला राज येण्याची चिन्हे आहेत.
यंदा महापालिकेत ११ सदस्यांची नव्याने भर पडल्याने एकूण सदस्य संख्या ९१ झाली आहे. ९१ सदस्यांमधून महिलांसाठी आरक्षित असलेल्या ५० टक्क्यानुसार ४६ जागांसाठी महापालिका प्रशासनाने आरक्षण जाहीर केले. महिलांचे आरक्षण वगळता उर्वरित सर्व जागांवर पुरुषांना लढता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवनमध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या उपस्थितीत आरक्षण साेडत प्रक्रिया पार पडली. यावेळी महिला प्रवर्गातून ‘एससी’ प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या १५ पैकी ८ जागा, ‘एसटी’ प्रवर्गातील दाेनपैकी एक व सर्वसाधारण प्रवर्गातील ७४ पैकी ३७ जागा अशा एकूण ४६ जागांची साेडत काढण्यात आली. प्रशासनाच्यावतीने उपायुक्त अनिलकुमार अढागळे यांनी महिलांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागनिहाय जागांचे वाचन केले. सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, निवडणूक विभागातील कैलास ठाकूर यांनी साेडत प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी शहरातील माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांनी नियाेजन भवनमध्ये गर्दी केली हाेती.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढल्या चिठ्ठ्या
मनपा प्रशासनाने प्रभागनिहाय आरक्षणाच्या चिठ्ठ्या उपस्थितांना दाखवित त्यांचे बंडल केले. त्या प्लास्टिकच्या एका गाेल भांड्यात टाकण्यात आल्या. यावेळी मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक ७ मधील चाैथीच्या वर्गातील प्रीतम नृपनारायण व साेनल नृपनारायण या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या काढून त्यांचे वाचन करण्यात आले.
आयुक्त म्हणाल्या, हरकती दाखल करा
आरक्षण साेडत प्रक्रियेदरम्यान काही माजी नगरसेवकांनी शंका विचारण्याचा प्रयत्न केला असता, आयुक्त कविता द्विवेदी यांनी १ जून ते ६ जून या कालावधीत आरक्षण निश्चितीबाबत हरकती, सूचना दाखल करण्याची सूचना केली. प्राप्त हरकती, सूचनांवर विचार करून १३ जूनराेजी राजपत्रात प्रभागनिहाय अंतिम आरक्षण प्रसिध्द केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.