अकोला : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेची नियमित सेवा बंद असली तरी सणासुदीच्या दिवसांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत असून, अकोला स्थानकावरून जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्स्प्रेससह मुंबई व नागपूरकडे जाणाऱ्या इतरही गाड्यांचे आरक्षण ३० नोव्हेंबरपर्यंत फुल्ल आहे. कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर लागू लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर रेल्वेकडूनही अनेक प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या विशेष प्रवासी गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवास करता येत नाही. मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या अकोला रेल्वेस्थानकावरून अनेक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. सधय दिवाळीची सुटी असल्यामुळे या गाड्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून, सर्वच गाड्यांच्या आरक्षणाची स्थिती ३० नोव्हेंबरपर्यंत फुल्ल आहे. या सर्व विशेष गाड्यांमध्ये प्रवास करताना कोविड १९ प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल
अकोल्याहून जाणाऱ्या गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये प्रतीक्षा यादी ७४ आहे. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये ८०, हावडा ते मुंबई मेलमध्ये ८०, हावडा-अहमदाबाद ८०, पुरी-अहमदाबाद ७५, कोल्हापूर-नागपूर ६० व अहमदबाद-हावडा हापा एक्स्प्रेसमध्ये ६० प्रतीक्षा यादी आहे.
अजूनही पूर्ण फेऱ्या सुरू नाहीत
मुंबई ते कोलकाता या महत्त्वाच्या लोहमार्गावर स्थित असलेल्या अकोला स्थानकावरून कोरोना लॉकडाऊनपूर्वी बहुतांश सर्वच महत्त्वाच्या गाड्यांना थांबा होता. आता विशेष गाड्यांनाही नियमित गाड्यांप्रमाणेच येथे थांबा आहे. तथापि, अजूनही पूर्ण फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे अकोलेकरांना विशेष गाड्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे.