अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसह नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासह महिलांसाठी आरक्षित जागांच्या प्रक्रियेला अंतिम मंजुरी तसेच राजपत्रात प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ देत १७ मे पर्यंत प्रक्रिया पुढे ढकलली. त्याबाबतचे पत्र आयोगाने निवडणूक विभागाला गुरुवारी पाठवले आहे.जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित जागा निश्चितीनंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वच राखीव प्रवर्गासह सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागांची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी ५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (नामाप्र) १४ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ गट आरक्षित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ५३ गटांच्या आरक्षणात सर्व संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी ५३ पैकी २७ गट राखीव करण्यात आले. सोडतीनंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे, विभागीय आयुक्तांनी अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम प्रभाग रचना, आरक्षणाला मंजुरीनंतर राजपत्रात प्रसिद्ध करण्याची मुदत १३ मे रोजी संपुष्टात आली. त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत प्रक्रियेला मुदतवाढ दिली. प्रशासकीय सोयीसाठी ही मुदतवाढ दिल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता मंजुरी आणि राजपत्रात प्रसिद्धीची प्रक्रिया १७ मे रोजी पूर्ण केली जाणार आहे; मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. २६ जून रोजीच्या सुनावणीनंतर त्याबाबत पुढील आदेश होण्याची शक्यता आहे.- जिल्हा परिषद गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण!अनुसूचित जाती गट : सर्वसाधारण - उगवा, वरुर, राजंदा,भांबेरी, कान्हेरी सरप, सस्ती. स्त्रीयांसाठी राखीव- व्याळा, पारस, हातरुण, चांदूर, बोरगावमंजू, हातगाव.अनुसूचित जमाती गट : सर्वसाधारण - पिंपळखुटा, जनुना. स्त्रीयांसाठी राखीव- अकोली जहागीर, महान, आगर.नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण - अकोलखेड, लाखपुरी, घुसर, कानशिवणी, अंदुरा, देगाव, शिर्ला. स्त्रीयांसाठी राखीव - दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., कुटासा, बपोरी, कुरणखेड, दगडपारवा.