अकोला, दि. २७- महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती, मागास प्रवर्गासह खुल्या प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत येत्या ७ ऑक्टोबर रोजी काढली जाणार आहे. नेमक्या याच दिवशी प्रशासनाने केलेल्या प्रभाग पुनर्रचनेचे नकाशेदेखील प्रसिद्ध केले जाणार असल्याने अकोलेकरांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.यंदा महापालिकेची निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे होईल. मनपा नगरसेवकांची संख्या विचारात घेऊन एका प्रभागात जास्तीत जास्त चार नगरसेवक अथवा तीन किंवा पाच नगरसेवकांचा समावेश करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या पालिका प्रशासनाला सूचना होत्या. सद्यस्थितीत मनपा क्षेत्रातील ३६ प्रभागांत ७३ नगरसेवक सेवारत आहेत. मनपात समाविष्ट झालेल्या गावांची लोकसंख्या, क्षेत्रफळ गृहीत धरून पालिका प्रशासनाने प्रभागांची पुनर्रचना केली. यामध्ये चार नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग, या प्रक्रियेनुसार २0 प्रभागांची रचना करण्यात आली. २0 प्रभागांमधून ८0 नगरसेवक निवडून येतील. हद्दवाढीमुळे जुन्या प्रभागांच्या क्षेत्रफळात मोठी वाढ झाल्याची माहिती आहे. एका प्रभागात किमान २४ हजार ते जास्तीत जास्त २९ हजार ५४३ लोकसंख्येचा समावेश असल्यामुळे विद्यमान नगरसेवकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ४ ऑक्टोबरला निघणार सूचनाप्रशासनाने आरक्षित प्रभागांची निश्चिती केली असून प्रभाग रचनेच्या आरक्षण प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सर्वांचे लक्ष लागलेली ओबीसी महिला, पुरुष प्रवर्गाच्या आरक्षण सोडतची नोटीस ४ ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ७ ऑक्टोबरला आरक्षणाची सोडत काढली जाईल.मनपात महिला राज२0 प्रभागांमधून ८0 नगरसेवक निवडून येतील. यातही ५0 टक्के आरक्षणाचा लाभ महिलांना मिळणार असून ४0 महिला नगरसेवकांचे स्थान निश्चित आहे. आरक्षणाची सोडत काढताना जातीनिहाय प्रत्येक प्रवर्गाच्या जागा राखीव आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये चांगलीच घालमेल सुरू झाली आहे. नकाशे होणार प्रसिद्धप्रभागाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाल्याने निवडणुकीत प्रचारादरम्यान उमेदवारांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे. साहजिकच अशावेळी प्रभागांची पुनर्रचना कशी झाली, आपल्या प्रभागाला कोणता भाग जोडण्यात आला, याबद्दल इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्कंठा आहे. आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर त्याच दिवशी मनपात प्रभाग पुनर्रचेनेचे नकाशे प्रसिद्ध केले जाणार आहेत.
७ ऑक्टोबरला आरक्षणाची सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2016 1:54 AM