अकोला : शासनामार्फत आरक्षित एक हजार मेट्रिक टन युरिया खतसाठा जिल्ह्यात विक्रीसाठी खुला करण्यात करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी शुक्रवार, २० ऑगस्ट रोजी आदेश दिला.
शासनामार्फत जिल्ह्यासाठी युरिया खताचा साठा आरक्षित करण्यात आला होता. आरक्षित खतसाठा विक्रीसाठी मुक्त करण्याच्या सूचना राज्याच्या कृषी आयुक्तांनी कृषी विभागाला दिल्या होत्या. त्यानुषंगाने कृषी विभागाच्या प्रस्तावानुसार जिल्ह्यासाठी आरक्षित एक हजार मेट्रिक टन युरिया खताचा साठा जिल्ह्यात विक्रीसाठी खुला करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार कृषी विभागामार्फत युरिया खताचा साठा जिल्ह्यातील सातही तालुक्यांत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी दिली. शेतकऱ्यांकडून युरिया खताच्या मागणीत वाढ होत असताना, आरक्षित खतसाठा विक्रीसाठी मुक्त करण्यात आल्याने, जिल्ह्यात युरिया खताचा साठा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.