अकोला : पाच महिन्यांपासून थकीत वेतनाच्या मागणीसाठी कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांसह मार्ड डॉक्टरांनी गुरुवारी काम बंद आंदोलनाला स्थगिती दिली. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्ववत सुरळीत झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला.थकीत वेतनासाठी मंगळवार, ६ आॅगस्टपासून आंतरवासिता डॉक्टरांसह कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. बुधवार, ७ आॅगस्ट रोजी ‘मार्ड’नेदेखील राज्यव्यापी आंदोलन छेडल्याने सर्वोपचार रुग्णालयातील एकूण २०० डॉक्टर्स संपावर होते. परिणामी, रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाविद्यालय प्रशासनातर्फे बुधवारी आंतरवासिता विद्यार्थ्यांचे जून २०१९ पर्यंतचे विद्यावेतन, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे जून २०१९ पर्यंतचे विद्यावेतन, कनिष्ठ निवासीचे मार्च २०१९ पर्यंतचे विद्यावेतन, वरिष्ठ निवासींचे मार्च २०२९ विद्यावेतन अदा केले. यानंतर अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी आंतरवासिता डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले. गुरुवारी सकाळी कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांसह मार्ड डॉक्टरांनीही संप मागे घेतला. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्ववत सुरळीत झाली.जिल्ह्यात पूर परिस्थिती असल्याने संप मागेजिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने मार्ड डॉक्टरांसह कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र त्यांना एकाच महिन्याचे वेतन अदा करण्यात आले असले तरी महाविद्यालय प्रशासनाने दोन दिवसांत दोन महिन्यांचे वेतन देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.