विवेक चांदूरकर / बुलडाणा मुंबई ते नागपूर आठपदरी महामार्ग (सुपर एक्स्प्रेस हायवे) बुलडाणा जिल्ह्यातून जाणार असून, या महामार्गालगत टाउनशीपही उभारण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील शेकडो शेतकर्यांची हजारो हेक्टर जमीन आंध्र पॅटर्ननुसार संपादित करण्यात येणार आहे. याला शेतकर्यांनी प्रचंड विरोध दर्शविला असून, यामुळे शेतकरी भूमिहीन होणार तर होणारच तसेच त्यांना शेताचा मुबलक मोबदलाही मिळणार नाही. त्यामुळे या महामार्गाला शेतकर्यांनी विरोध केला आहे. नागपूर ते मुंबई या आठपदरी महामार्गालगत टाउनशीप उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या टाउनशीपमध्ये विविध उद्योग निर्माण करण्यात येतील. महामार्ग व टाउनशीपकरिता जमीन जाणार असल्यामुळे शेतकर्यांनी या महामार्गाला विरोध दर्शविला आहे. विविध भागातील शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदन देऊन विरोध व्यक्त केला आहे. या महामार्गावर दुसरबीड, वर्दळी व केशवशिवणी भागातील १ हजार एकर जमीन जाणार आहे. टाऊनशीपकरिता शेतकर्यांना जमिनीची मागणी करण्यात आली असून, आंध्र पॅटर्ननुसार मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे; मात्र शेतकर्यांनी जमीन देण्याला विरोध दर्शविला आहे, तसेच रायरी व सिंदखेड राजा या भागात शासनाची एक हजार एकर ई - क्लासची जमीन आहे. त्या ठिकाणी सदर टाउनशीप हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकर्यांची जमीन मक्याने घेऊन त्यांना प्रती एकरी त्यांचीच १0 गुंठे जमीन दिल्या जाणार आहे. यामध्ये शेतकर्यांना उद्योग करावा लागणार आहे; मात्र वर्षानुवर्षांंपासून शेती करणार्या शेतकर्यांनी या ठिकाणी कोणता व्यवसाय करावा, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
शेतक-यांचा भूसंपादनाच्या आंध्र पॅटर्नला विरोध
By admin | Published: June 22, 2016 11:57 PM