अकोट: श्री संत वासुदेव महाराज यांच्या पादुकांचे पंढरीची वारी पूर्ण करून गुरुपौर्णिमेला श्री क्षेत्र श्रद्धासागरला आगमन झाले. टाळ-मृदंगांच्या गजरात भाविकांनी स्वागत केले.
यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर वारी रद्द झाली. कौडण्यपूर रुख्मिणी आईच्या पालखीसोबत विदर्भातील प्रमुख दहा दिंडीच्या प्रतिनिधींना सहभागी करण्यात आले. त्यामध्ये संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष हभप वासुदेवराव महल्ले, विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे, गुरुमाउलींच्या पादुकांसह सहभागी झाले. गुरुपौर्णिमेला रुख्मिणी आईसह गुरुमाउलींच्या पादुकांचे पंढरपूरहून प्रस्थान झाले. कौडण्यपूर येथून गुरुमाउलींच्या पादुकांचे श्रद्धासागरला आगमन होताच भाविकांनी भक्तिभावपूर्ण स्वागत केले. गुरुमाउली पादुकांची पंढरपूर वारी परंपरा खंडित न झाल्यामुळे तथा रुख्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यात गुरुमाउलीच्या पादुकांना मान मिळाल्यामुळे भाविकांद्वारे समाधान व्यक्त केल्या जात आहे. ‘श्रीं’चे पादुकांचे पूजन व महाआरती पार पडली. यावेळी हभप गणेश महाराज व संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले यांचा वासुदेव भक्तांनी सत्कार केला. याप्रसंगी संस्थाध्यक्ष महल्ले, गणेश महाराज, संस्थेचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर, अनिल कोरपेंसह माधवराव मोहोकार, प्रा. साहेबराव मंगळे, सागर महाराज परिहार, विष्णू महाराज गावंडे, धनंजय वाघ, संस्थेचे व्यवस्थापक अमोल मानकर, व्यवस्थापक दिलीप कुलट, सुधाकरराव पुंडकर यांच्यासह भाविक हजर होते.