अकोला : जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशभरात स्वयंस्फुर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याच्या आवाहनला अकोलेकरांनी रविवारी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे सकाळपासूनच पहावयास मिळत आहे.
अकोल्यातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट असून, तुरळक अपवाद वगळता वाहनांची कोणतीही वर्दळ दिसत नाही. शहरातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असल्याने बाजारपेठ पूर्णत: बंद आहे. रेल्वे स्थानक़, बसस्थानकांवरही प्रवाशांची कोणतीही गर्दी नसून, वाहतुक व्यवस्थाही पूर्णपणे बंद असल्याचे चित्र आहे. शहरातील आॅटोरिक्षाचालकांनीही जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिल्याने एकही आॅटोरिक्षा रस्त्यावर दिसत नव्हती. पेट्रोलपंप सुरु असले, तरी त्या ठिकाणी वाहनधारकांची कोणतीही गर्दी नाही. सकाळी दुध व वृत्तपत्र टाकणाºयांचा अपवाद वगळता रस्त्यांवर कोणीही दिसत नव्हते. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून २२ मार्च ते २४ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत अकोला लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्याची सुरुवात रविवारच्या जनता कर्फ्यूपासूनच झाल्याचे चित्र अकोल्यात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नसल्याने सगळीकडे शांतता पसरल्याचे चित्र आहे. पंतप्रधानांच्या आवाहनास प्रतिसाद देत नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याने जनता कर्फ्यू यशस्वी होताना दिसत आहे.
तालुक्याची शहरे व ग्रामीण भागातही संचारबंदीअकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी व मुर्तीजापूर या तालुक्यांच्या शहरांमध्येही रविवारी सकाळपासूनच जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला आहे. शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाने वगळता इतर दुकाने बंदच आहेत. या तालुक्यांमधील सर्वच लहान-मोठ्या गावांमध्येही ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.