अकोला : हैदराबाद ते जयपूर या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या ०७११५ हैदराबाद-जयपूर या साप्ताहिक गाडीला मिळणारा प्रतिसाद व या मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी पाहता दक्षिण-मध्य रेल्वेने या गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात या गाडीच्या आणखी चार फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्र. ०७११५ हैदराबाद-जयपूर व ०७११६ जयपूर-हैदराबाद या विशेष गाड्या अनुक्रमे १ व ३ जुलैपासून सुरू करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्यांना ऑगस्टमध्ये मुदतवाढ मिळाल्याने त्या अनुक्रमे ३० सप्टेंबर व २ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आल्या होत्या. आता या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांना आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ०७११५ हैदराबाद-जयपूर ही विशेष गाडी ७ ते २८ ऑक्टोबर या काळात दर शुक्रवारी रात्री ८.२० वाजता हैदराबाद येथून निघून शनिवारी पहाटे ५.४० वाजता अकोला रेल्वे स्थानकावर येऊन पुढील प्रवासासाठी रवाना होईल. त्याचप्रमाणे ०७११६ जयपूर-हैदराबाद ही साप्ताहिक विशेष गाडी ९ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत दर रविवारी जयपूर येथून दुपारी ३.२० वाजता निघून सोमवारी दुपारी ३.१० वाजता अकोला स्थानकावर आल्यानंतर हैदराबादसाठी रवाना होईल.