अकोटः तालुक्यातील गौण खनिज अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सहा पथके गठीत करण्यात आली असून, महिला तलाठी सक्रिय झाल्या आहेत. रात्रभर पावसाळ्यात तपासणी नाक्यावर पहारा देत आहेत. त्यामुळे गौण खनिजाच्या चोरट्यांसह अवैध वाहतुकीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी गौण खनिज अवैध वाहतुकीचा प्रश्न पटलावर घेतला आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी पथक नियुक्त करण्याचा आदेश जारी केला. त्यामुळे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी २४ तास नियत्रंण अधिकारी - कर्मचाऱ्यांचे पथक गठीत केले आहे. एकूण सहा पथके तयार केली आहेत. नियत्रण अधिकारी म्हणून हरीश गुरव, तर प्रत्येक पथकाचे प्रमुख म्हणून मंडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकाद्वारे मुरुम, गिट्टी, माती इतर गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, दिनांक १४ सप्टेंबर रोजी रात्रभर पावसात मंडल अधिकारी पी. व्ही. साळवे, तलाठी संजय तळोकार, इरफान सरदेशमुख, मेघा पाटील, जयश्री बेलसरे व ए. एस. अवारे हे वाहनांची तपासणी करीत असल्याचे दिसून आले. पथकाला तपासणी नाक्यावर नोंदवहीमध्ये कार्यवाहीची नोंद घेणे आवश्यक करण्यात आले असून, अहवाल सादर करण्याचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सूचित केले आहे. अवैध वाहतूक करताना वाहन आढळल्यास वाहनचालकावर दंडात्मक तथा फौजदारी तसेच तपासणी नाक्यावरुन तपासणी न करता सोडण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यास प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे.
----------------------
गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सहा पथकात २४ तास अधिकारी - कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाच्या कार्यवाहीची आढावा दर पंधरा दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.
-नीलेश मडके, तहसीलदार अकोट.
--------------
पथकात यांचा समावेश
या पथकात तलाठी, पोलीस शिपाई, कोतवालांचा समावेश आहे. पथकाला वार व वेळ ठरवून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पथकात महिला तलाठी यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीसुध्दा जंगलातील गाजीपूर या ठिकाणी तपासणी नाक्यावर महिला तलाठी कर्तव्य बजावत आहेत.