अकोला : राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा संक्रमणाचा वेग जास्त असल्याने अकोल्यात सोमवारपासून तिसऱ्या टप्प्यातील निकषानुसार निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीने घेतला आहे. यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश दिले असून त्याची अंमलबजावणी साेमवारपासून हाेत आहे.
जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट ओसरू लागली असून जवळपास सर्वच बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली आहे. अशातच राज्यात कोविडच्या डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळून आल्याने राज्य शासनाने सतर्कतेची भूमिका घेत राज्यभरात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतिष्ठानांसोबतच इतरही प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजतापर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत, मात्र वीकेंडला औषधांची प्रतिष्ठाने वगळून उर्वरित संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहेत.
जमावबंदी व संचारबंदी
संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. तसेच सायंकाळी पाचनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू राहील. या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करण्यास मनाई राहील.