अकोट : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुनर्वसित ग्रामस्थांनी मेळघाटातील जुन्या गावी गत पाच दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे त्यांना रेशन पोहोचविण्याकरिता व व्याघ्र प्रकल्पातून औषधोपचारासाठी बाहेर आणण्याचा अर्ज केलपाणी येथील पुनर्वसित ग्रामस्थांनी वन्यजीव विभागाकडे १८ जानेवारी रोजी सादर केला आहे.अकोट उपविभागातील आठ गावांचे पुनर्वसित गावकरी पूर्ण तयारीनिशी मेळघाटातील जुन्या गावी गेले आहेत. या ठिकाणी त्यांनी राहुट्या उभारून संसार मांडला आहे. जुन्या असलेल्या जमिनीवरील शासकीय साहित्य हटवून ती जागा वहितीकरिता देण्याची मागणी समजूत काढण्याकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. व्याघ्र प्रकल्पात राहण्याकरिता गेलेल्या कुटुंबांकडील असलेले अन्नधान्य संपण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत त्यांना वेळेवर अन्न पोहोचविण्याकरिता मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्नधान्य पोहोचविण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच तेथील आजारी लोकांना औषधोपचाराकरिता व्याघ्र प्रकल्पातून बाहेर येण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाचा अर्ज केलपाणी येथील जयराम बेठेकर या ग्रामस्थाने अकोट वन्यजीव विभागाला दिला आहे. दरम्यान, पुनर्वसित ग्रामस्थांनी कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने हा तिढा सोडविणे गरजेचे झाले आहे. अकोट वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुनर्वसित ग्रामस्थ व वन विभागातील अधिकारी यांच्यातील पेचप्रसंग सध्यातरी कायम आहे.
१६ पुनर्वसित ग्रामस्थांवर गुन्हे दाखलमेळघाटातील जुन्या गावी जात असताना खटकाली नाक्यावर वन कर्मचाºयांशी झोंबाझोंबी करून सरकारी साहित्याची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये १६ पुनर्वसित ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोट येथून धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा, केलपाणी खु., केलपाणी बु., बारुखेडा, अमोणा, नागरतास या आठ गावांतील पुनर्वसित गावकºयांनी १५ जानेवारी रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आपल्या जुन्या गावी विविध मागण्यांची पूर्तता करण्याकरिता गेले. व्याघ्र प्रकल्पातील जंगलात जाताना आधी पोपटखेड गेट पार करून खटकाली येथील गेटवर वन विभागाच्या कर्मचाºयांनी अडविले असता या ठिकाणी वन कर्मचाºयांसोबत झोंबाझोंबी करण्यात आली, तसेच वन विभागाच्या साहित्याची तोडफोड करण्यात आल्याच्या आरोपाखाली सहायक उपवनसंरक्षक यांनी चिखलदरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चंपालाल बेठेकरसह १६ पुनर्वसित ग्रामस्थांविरुद्ध भादंवि ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.