अकोला : दरमहा १ तारखेला सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन (पेन्शन) दिले जात असले, तरी ‘मार्च एन्डिंग’च्या लगबगीत ३ एप्रिल उलटून गेल्यावरही जिल्ह्यातील सेवानिवृत्त १४ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी निवृत्तीवेतनाच्या प्रतीक्षेत (वेटिंग) आहेत. ६ एप्रिल रोजी सेवानिवृत्तधारकांच्या खात्यात ‘पेन्शन’ची रक्कम जमा होण्याची शक्यता जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत वर्तविण्यात आली आहे.विविध विभागांतर्गत जिल्ह्यातील १४ हजार ५०० सेवानिवृत्त सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दरमहा ‘पेन्शन’ दिली जाते. महिन्याच्या १ तारखेला पेन्शनची रक्कम सेवानिवृतधारकांच्या बँक खात्यात जमा केली जाते.‘मार्च एन्डिंग‘च्या पृष्ठभूमीवर जिल्हा कोषगार कार्यालयात प्रलंबित कामे मार्गी लावण्याची लगबग सुरू असल्याने, एप्रिल महिन्याची ३ तारीख उलटून गेली तरी, जिल्ह्यातील सरकारी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पेन्शन’ मिळाली नाही. त्यामुळे मार्च महिन्याची पेन्शनची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. जिल्हा कोषागार कार्यालयातील ‘मार्च एन्डिंग’ची प्रलंबित कामे मार्गी लागल्यानंतर ६ एप्रिल रोजी सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ‘पेन्शन’ची रक्कम जमा होणार असल्याची शक्यता जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत वर्तविण्यात आली आहे.जिल्हा कोषागारात देयकांचा निपटारा सुरूच!विविध योजना-विकास कामांसह कर्मचाऱ्यांच्या वेतनाची देयके तसेच प्राप्त अनुदानाची देयके ३१ मार्चपर्यंत जिल्हा कोषागार कार्यालयात स्वीकारण्यात आली. स्वीकारण्यात आलेल्या देयकांचा निपटारा करण्याचे काम जिल्हा कोषागार कार्यालयात अद्याप सुरू आहे.‘मार्च एन्डिंग’मुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन (पेन्शन) देण्यास विलंब झाला आहे. ६ एप्रिल रोजी सेवानिवृत्तधारकांच्या बँक खात्यात ‘पेन्शन’ची रक्कम जमा करण्यात येणार आहे.- एम. बी. झुंजारे, जिल्हा कोषगार अधिकारी.