लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थकबाकीच्या वाढत्या डोंगरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने आता थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम आखली असून, या मोहिमेत महावितरणच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही सहभागी होता येणार आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडून थकबाकीची वसुली करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिकृत करायचे आणि यापोटी त्यांना विशेष भत्ता म्हणून वसुलीच्या एक ते दोन टक्के रक्कम द्यायचा, असा हा निर्णय महावितरणने घेतला आहे.राज्यात मुंबई वगळता सर्वत्र महावितरणद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. विजेचा वापर करणारे ग्राहक वीज देयक भरत असले, तरी काही ग्राहक वीज देयक भरत नाहीत. त्यामुळे महावितरणची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच आहे. आजमितीस महावितरणची राज्यात २३ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये १७ हजार कोटी रुपये कृषिपंपांची थकबाकी आहे. एवढी मोठी रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणकडून वसुली मोहीम राबविली जाते. महावितरणच्या वित्त विभागाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कृषिपंपांची थकबाकी वगळता उर्वरित सहा हजार कोटींची थकबाकी वसूल करण्याच्या कामात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने सहभागी होता येणार आहे. सहभागी कर्मचाऱ्याने थकबाकी वसुली करताना ज्याचा वीज पुरवठा दोन वर्षांपूर्वी थकबाकीमुळे कापण्यात आला आहे, अशा ग्राहकांकडून वसुली केल्यास त्याला दोन टक्के रक्कम विशेष भत्ता म्हणून दिली जाणार आहे, तर थकबाकी न भरल्यामुळे ज्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित होऊन एक वर्षाहून अधिक व दोन वर्षांहून कमी कालावधी झाला आहे, अशांकडून वसुली केल्यास रकमेच्या एक टक्का विशेष भत्ता मिळणार आहे.स्वेच्छापत्र देणे अनिवार्यथकबाकी वसुलीकरिता आखण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या महावितरणच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यासाठी एक स्वेच्छापत्र विभागीय व मंडळ कार्यालयात द्यावे लागणाार आहे. याद्वारे ते उच्चदाब व लघुदाब वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करू शकणार आहेत. सहभागी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या वसुलीची माहिती संबंधित कार्यालयास सादर करावी लागणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांकडून सर्व माहिती मिळाल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून त्याची पडताळणी केली जाईल व त्यानंतर त्या कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात विशेष भत्ता वळता करण्यात येणार आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही करता येणार थकबाकी वसुली!
By admin | Published: July 15, 2017 1:23 AM